Sunday, 12 May 2019


हेमाडपंथी जगदंबा मंदिर : टाहाकारी, अकोले


पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. 

राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर पाहन्यासारखे आहे. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.


सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.

 अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

आढळा नदीवरील टाहाकारी मंदिर तीन पांढरे कळस असलेले आणि मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात.

टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.

मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.

मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.

मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.

मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे - टाकेद गाव - टाहाकारी
२) नाशिक सिन्नर- ठाणगांव - टाहाकारी
३) नाशिक सिन्नर - डुबेर - पाडळी - समशेरपुर फाटा - टाहाकारी

✍️ भिमाशंकर सहाणे - नाशिक ट्रेकर्स





Sunday, 21 April 2019

कावनाई कपिलधारा तीर्थ क्षेत्र

कवनाई तीर्थ क्षेत्र -


एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचेही मानले जाते. तर या स्थानाला चिनी प्रवासी ह्युएनत्संगचाही सहवास लाभला आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. येथील परिसरात गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. कावनईचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे कपिलधारा तीर्थ व कामाक्षी मंदिर. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्‌मध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असल्याचे म्हटले जाते. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे. कावनईच्या राम मंदिरात ह्युएनत्संग (ह्यु-एन-त्संग) या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा आहे. ह्युएनत्संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५ च्या दरम्यान कावनईला भेट दिली होती. 
कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन –१. कांचीपुरा, २.गुवाहाटी व ३.करंजगाव (शेगाव).
कावनाई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्‍या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.
भविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.
कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.
श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्‍या त्‍या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्‍यात चार-पाच व्‍यक्‍ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. या पवित्र तीर्थास एक भेट... ✍️ भिमाशंकर सहाणे...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2313363255395002&id=100001640504883

Thursday, 24 January 2019

मोहनदर किल्ला - मोहनदरी ट्रेक (नेढ)



मोहनदरी ट्रेक -एक अविस्मरणीय ट्रेक

किल्ल्याचा प्रकार : 
गिरीदुर्ग




डोंगररांग: 
सातमाळ
जिल्हा : नाशिकश्रेणी : कठीण

मोहनदर किल्ला
पहाटे 4 वाजता जाण्याचे ठरले. मोहनदरी ट्रेक सर्वांसाठी नवीन. दुपारी परतीचे नियोजना मुळे ट्रेक पूर्ण करून परत नाशिक गाठायचे होते. 
पहाटे साडे चार वाजता मित्राच्या गाडीतून आम्ही आठ जन मोहनदरी कडे निघालो.
 मोहनदर किल्ला हा सप्तश्रृंगी देवीला जाताना एक गोल बोगदा असणारा डोंगर! मोहनदरी गावात गेल्यावर गाडी पार्क केली आणि डोंगर चढायला सुरुवात केली. चंद्राच्या प्रकाशात गोल नेढ़ दिसत होती. साडे पाच झाले असावेत. रस्ता माहित नव्हता. पण गावतुन पाय वाट एकाने दाखवून दिली. सर्वांकडे टोर्च होत्या. वाट शोधत, चुकत शिकत डोंगराच्या मध्यावर गेलो. रस्ता तसा अवघड होता. पण काही झाले तरी सुर्योदय वरतून बघायचे होते. आम्ही एक तासत नेढे पर्येन्त गेलो.
 मोठ्या हिमतीने आम्ही 10 ते 15 फुट कडा चढून गोल नेढयात पोहचलो. तेथुन दिसनारा निसर्ग मनमोहक आणि अविस्मरणीय होता. खुप सुंदर सूर्योदय बघायला मिळाला. खुप सारे फोटो काढले. सर्व जन या सुंदर सूर्योदय आणि गोल नेढे बघुन तृप्त झाले. मनमुराद फोटो काढून झाल्यावर बरोबर आनलेले डबे खायला घेतले. एवढ्या उंचीवर जेवनाची मजा काही निराळीच! हे अद्भुत सौन्दर्य डोळ्यात साठवून आता परतीचा मार्ग पकड़ायचा होता. एक मेकाला साथ देत खाली उतरलो. पुन्हा गाड़ीत गप्पा गोष्टी करत नाशिकला आलो.

हा ट्रेक अनुभव खुप सुन्दर होता तसा तो अविस्मरणीय राहील कारण कोणत्याही रोप शिवाय आम्ही तो कडा (नेढ) चढून गेलो होतो. हा ट्रेक करताना प्रस्ताररोहनाचे साहित्य जवळ असुद्या. कोणताही ट्रेक करताना सुरक्षितता खुप महत्वाची!

मोहनदरी किल्लायाबद्दल थोडक्यात:
नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो.

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडले. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.

मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहण करून १२ ते १५ फ़ुट चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी जातात.
गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.

गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते.

मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग:

मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.




-भिमाशंकर सहणे, नाशिक ट्रेकर्स