एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिकबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचेही मानले जाते. तर या स्थानाला चिनी प्रवासी ह्युएनत्संगचाही सहवास लाभला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लक्ष वेधते. येथील परिसरात गजानन महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. कावनईचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे कपिलधारा तीर्थ व कामाक्षी मंदिर. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्मध्ये म्हटले आहे. श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असल्याचे म्हटले जाते. कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे. कावनईच्या राम मंदिरात ह्युएनत्संग (ह्यु-एन-त्संग) या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा आहे. ह्युएनत्संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५ च्या दरम्यान कावनईला भेट दिली होती.
कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन –१. कांचीपुरा, २.गुवाहाटी व ३.करंजगाव (शेगाव).
कावनाई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.
भविकांकडून कामाक्षी देवीच्या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.
कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.
श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्या त्या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्यात चार-पाच व्यक्ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. या पवित्र तीर्थास एक भेट... ✍️ भिमाशंकर सहाणे...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2313363255395002&id=100001640504883
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2313363255395002&id=100001640504883


